पुरंदर रिपोर्टर Live ..
सोमेश्वरनगर | विजय लकडे.
७०-८० च्या दशकात पैलवान होणं हे केवळ शारीरिक कष्ट नव्हते, तर ती होती एक तपश्चर्या! त्या काळात अनेक आखाडे गाजवणारे आणि कुस्तीमधील झुंजार प्रवास घडवणारे पैलवान आता एकत्र आले, ते केवळ नवनाथ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष पैलवान तानाजी सोरटे यांच्या पुढाकारामुळे.
सोमेश्वर नगर येथे महाराष्ट्र चॅम्पियन पै.तानाजी संभाजी काळोखे, पै.प्रकाश मारुती कळवे, महाराष्ट्र चॅम्पियन पै.संभाजी मारुती राक्षे,पै.नारायण बाबुराव मोठे,पै.दिलीप शेठ पिंजन, पै.अशोक काळभोर हे सारे लढवय्ये नवनाथ उद्योग समूहाच्या कार्यालयात एकत्र आले. यावेळी त्यांनी नवनाथ उद्योग समूह संस्थापक अध्यक्ष तानाजी सोरटे यांना सदिच्छा भेट दिली. जुन्या सवंगड्यांचा सन्मान करताना तानाजी सोरटे यांनी सर्वांचा मोठ्या आत्मीयतेने आदर सत्कार केला आणि एकत्र येत जुन्या पैलवानीच्या आठवणींना हृदयस्पर्शी उजाळा दिला.
या भेटीत जुन्या पैलवानांच्या डोळ्यांत जुन्या लढतींची आठवण भरून आली. अनेकांनी गहिवरून आठवणी सांगितल्या. विशेष म्हणजे या सर्व पैलवानांनी आज देखील कुस्तीशी नाळ जुळवलेली आहे. ते नवे पैलवान घडवत आहेत, कुस्तीतील बारकावे शिकवत आहेत आणि महाराष्ट्र केसरी बनवण्यासाठी नवोदितांना मार्गदर्शन करत आहेत.
स्वतःचे महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न दुखापतीमुळे अपूर्ण राहिलं असलं तरी तानाजी सोरटे यांनी त्यातून खचून न जाता मगरवाडी येथे कुस्ती केंद्र सुरू केलं आहे. या केंद्रात सुमारे शंभर नवोदित पैलवान तयार होत आहेत. जुन्या मित्रांनी या कुस्ती केंद्राला भेट देऊन तानाजी सोरटे यांना शाबासकीची थाप दिली आणि नव्या पिढीला प्रेरणा दिली.
या भेटीत जुन्या पैलवानीच्या आठवणींनी पुन्हा जिवंत होत एक वेगळाच ऊर्जा संचारली. एक काळ गाजवणारे हे पैलवान आजही महाराष्ट्राच्या मातीतून पुन्हा नवे मल्ल घडवण्यासाठी झपाटले आहेत.
महाराष्ट्र केसरी न मिळाल्याचं दुःख, पण स्वप्न अजूनही चालूच…
पै.तानाजी सोरटे यांचं ‘महाराष्ट्र केसरी’ बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. मात्र त्यासाठी खचून न जाता त्यांनी पुढची पिढी घडवण्याचा निश्चय केला. मगरवाडी येथे त्यांनी कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे, जिथं सुमारे शंभर नवोदित पैलवान नियमित सराव करत आहेत. हे केंद्र केवळ प्रशिक्षण देत नाही, तर जुन्या पैलवानांच्या अनुभवांचं सोनं नव्या पिढीला देत आहे.
आजही हे जुने पैलवान कुस्तीशी जोडलेले आहेत. नवीन पिढीला कुस्तीतील बारकावे शिकवणे, मानसिक आणि शारीरिक तयारी घडवून आणणे, आणि मोठ्या स्पर्धांसाठी त्यांना तयार करणे – हेच या लढवय्यांचं आजचं ध्येय बनलं आहे. महाराष्ट्र केसरी किंवा हिंद केसरी सारख्या स्पर्धा हे या नव्या पैलवानांचं लक्ष्य आहे आणि हे लक्ष्य गाठण्यासाठी या जुन्या दिग्गजांचं मार्गदर्शन त्यांना मोलाचं ठरत आहे. यावेळी सोमेश्वर चे संचालक संग्राम सोरटे त्यांच्याबरोबर सोमेश्वर पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments